याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राम्हणवाडे गावातील मळे परिसरात संध्याकाळच्या सुमारास मुलगी घराजवळच्या परिसरात खेळत होती. तेव्हा अंधार असल्याचा फायदा घेत बिबट्याने या चार वर्षीय चिमुकलीवर झडप घातली. बिबट्याने तिला आपल्या जबड्यात धरून फरफटत जंगलाच्या दिशेने नेलं. ही बाब स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना माहिती दिली. तसेच, या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनरक्षक, वन मजुरांसह गावकऱ्यांचे शोध कार्य सुरू असताना काही अंतरावर मुलीचा मृतदेह आढळून आला आहे.
हृदय पळवटून टाकणाऱ्या या घटनेत ब्राम्हणवाडे येथील नवसू पांडू कोरडे यांची ४ वर्षांची मुलगी नयनाला बिबट्याने घराच्या अंगणातून नेले. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिक बिबट्याच्या दहशती खाली वावरत आहेत परिसरात बिबट्याचा संचार असल्याने अनेक शेतकरी देखील चिंतेत आले आहेत. दरम्यान या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांकडून वन विभागाला धारेवर धरत बिबट्याचा संचार वाढल्याने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे परिसरात पिंजरे लावण्याची मागणी केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील वेळुंजे येथे बिबट्याने एका लहान मुलाला ठार केले होते. ही घटना ताजीच असताना पुन्हा एकदा त्रंबकेश्वर तालुक्यात बिबट्याने चार वर्षीय चिमुकलीला ठार केले आहे. बिबट्यांना चिमुकलीला उचलून नेल्यानंतर ही बाब लक्षात येताच गावकऱ्यांनी व वन विभागाने सर्वत्र शोधाशोध केली त्यानंतर मात्र चिमुकलीचा मृतदेह आढळून आला.