मुंबई महापालिका निवडणुका कधी होणार, याची गेल्या सहा महिन्यांपासून उत्सुकता लागली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल वर्षा या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी गप्पा मारल्या. यावेळी, महापालिका निवडणुका जानेवारीत होऊ शकतात, असे संकेत शिंदेंनी दिले.
मुंबईसह राज्यातील अनेक महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामं रखडल्याची तक्रार अनेक नागरिक करतात. आता महापालिका निवडणुकांनंतर अनेकांच्या समस्या मार्गी लागण्याची चिन्हं आहेत.
दुसरीकडे, निवडणूक कधी घ्यायची हे देव आणि कोर्ट हे दोघंच ठरवतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. शिवसेना कोणाची हा निर्णय निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्यामुळे महापालिका निवडणुकाही रखडल्या आहेत. आता या निवडणुकांना बाळासाहेबांची शिवसेना-भाजप दोनच पक्ष युतीत सामोरे जाणार, की मनसेही त्यांच्या साथीला येणार, याची उत्सुकता आहे.
हेही वाचा : पाडव्याच्या निमित्ताने पवार कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी ‘गोविंदबाग’ गजबजलं!
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर गेले होते. यावेळी फडणवीस आणि शिंदे या दोघांमध्ये जवळपास अर्ध्या तासाहून जास्त काळ बैठक झाली. दोघांमध्ये कुठल्या विषयावर बैठक झाली, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र दोन महिन्यापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची शक्यता आहे.
शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरही नाराजीचा सूर उमटला होता. पण आता या नाराजीवर उतारा निघण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल एका अनौपचारिक गप्पांमध्ये विस्ताराचे संकेत दिले.
हेही वाचा : शंभुराज देसाईंचा विजय शिवतारे होईल, राष्ट्रवादीचा पलटवार