पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, येत्या काही दिवसांमध्ये रेवदंडा पोलीस ठाण्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल दिला जाईल. त्यानंतर येत्या सात दिवसांत रश्मी ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईल, असे आश्वासन मला देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे १९ बंगले रेकॉर्डवरुन गायब केले. मुख्यमंत्री कार्यालयाने यासाठी संबंधित यंत्रणेवर दडपण आणले. अधिकारी किरण पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी १३ वर्षांमधील बंगल्यांचा तपशील नष्ट करण्याचे आदेश दिले. किरण पाटील हे सरकारी अधिकारी असूनही मातोश्रीसाठी काम करत होते. रश्मी ठाकरे यांनी १३ वर्षे या बंगल्यांसाठीची घरपट्टी भरली होती. परंतु, ठाकरे सरकारच्या काळात हे प्रकरण दडपण्यात आले, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
मात्र, शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पहिला अहवाल आला त्यामध्ये जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीने रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे १९ बंगले असल्याची बाब कबूल केली. २०२२ मध्ये दबावामुळे आम्ही १९ बंगल्यासंदर्भातील तपशील मिटवल्याची कबुली त्यांनी दिली, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. रश्मी ठाकरे यांच्या या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी अशी मागणी आम्ही करणार आहोत. ज्याप्रमाणे अनिल परब यांच्या रिसॉर्टची चौकशी झाली आणि कारवाई करण्यात आली. तशीच कारवाई रश्मी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात करण्यात यावी अशी आमची मागणी आहे, असेही सोमय्या यांनी सांगितलं.