राज्य सरकारने यापूर्वीच विनायक मेटे यांच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार फॉरेन्सिक टीमने विनायक मेटे यांच्या गाडीची तपासणी केली होती. तर दुसरीकडे पोलिसांच्या तपासाची चक्रेही वेगाने फिरत आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर विनायक मेटे यांच्या गाडीला धडक देणाऱ्या ट्रकच्या चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर दुसरीकडे या सगळ्या घटनाक्रमात विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकाचीही भूमिका संशयास्पद मानली जात आहे. विनायक मेटे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या अंगरक्षकाला गंभीर दुखापत झाली होती. त्याचवेळी विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक मात्र सुखरुपरित्या बचावला होता. त्यामुळे पोलीस आता मेटे यांच्या चालकाचीही चौकशी करत आहेत. ट्रकचालक आणि विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकाला समोरासमोर बसवून त्यांची पोलीस चौकशी करत आहेत. त्यामुळे आता या सगळ्या तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
..पण माझं लेकरू मारायचं नव्हतं; मेटेंच्या आईंची प्रतिक्रिया
विनायक मेटे यांच्या अपघाताबाबत प्रचंड संभ्रम आणि शंकु-कुशंकेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांच्या आईनेही अशाच धाटणीची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना आमदारकी द्यायची नव्हती..मंत्रिपद द्यायचं नव्हतं..पण माझं लेकरू मारायचं नव्हतं, असे विनायक मेटे यांच्या आईने म्हटले. त्यामुळे विनायक मेटे यांच्या आईच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने आहे, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.