पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ असलेले नेते संजय राऊत तुरुंगात गेल्यानंतर ठाकरे गटाकडे प्रभावी वक्ता उरला नव्हता. मात्र, नव्यानेच ठाकरे गटात प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली होती. अंधारे यांनी अल्पावधीतच शिवसेनेच्या (ठाकरे गट) फायरब्रँड नेत्या म्हणून स्वत:ची ओळख प्रस्थापित केली होती. सुषमा अंधारे यांच्या नेतृत्त्वाखालील ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. महाप्रबोधन यात्रेतील सुषमा अंधारे यांच्या भाषणांमुळे शिंदे-फडणवीस सरकारविरोधात वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, हे सगळे सुरु असतानाच शिंदे गटाने वैजनाथ वाघमारे अडसरकर यांना गळाला लावून सुषमा अंधारे यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे गटाकडून वैजनाथ वाघमारे अडसरकर यांच्यावर एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यामुळे आगामी काळात राजकीय मैदानात सुषमा अंधारे आणि वैजनाथ वाघमारे अडसरकर आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांच्या सोबत, अभिनेत्री दिपाली सय्यद यांचाही आज शिंदे गटात प्रवेश होणार आहेत. वाघमारे यांना प्रवेश देऊन शिंदे गटाने सुषमा अंधारे यांची डोकेदुखी वाढवल्याचे सांगितले जात आहे.
तुम्ही निकराने खिंड लढवली; राऊतांकडून सुषमा अंधारे यांचे कौतूक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नुकतीच खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी शिवसेनेतील फुटीनंतर भक्कमपणे पक्षाची बाजू मांडल्याबद्दल संजय राऊत यांनी सुषमा अंधारे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती. भेटीवेळी मी राऊतसाहेबांना म्हटलं, सर आम्ही खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या परीने खिंड लढवली. फार मोठे काही केलं नाही. त्यावर राऊत साहेब उत्तरले, ही खिंड निकराने लढलात, त्यामुळे ती पावनखिंड झाली, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले होते.