यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचा समृद्धी महामार्गावरील प्रवासाचाही अनुभव सांगितला. आम्ही समृद्धी महामार्गावर टेस्ट राईड घ्यायचे ठरवले त्यादिवशी देवेंद्र फडणवीस यांचा गाडी चालवायचा मूड होता. तेच म्हणाले, मी गाडी चालवतो, तुम्ही बाजूला बसा. मलाही गाडी चालवता येते. ज्या माणसाला गाडी चालवता येते, तो बाजूला बसला असेल तर त्याला फार भीती वाटत नाही. परंतु, मला गाडी चालवता येत असल्याने सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी वेगाने गाडी चालवली तेव्हा मला थोडी भीती वाटली. पण देवेंद्र फडणवीस पट्टीचे ड्रायव्हर निघाले, त्यांनी कमाल ड्रायव्हिंग केले, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांचा सुस्साट स्पीड, ५२९ किलोमीटरचं अंतर पावणेपाच तासात कापलं
समृद्धी महामार्गावरील टेस्ट राईडवेळी देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल १५० किमीच्या स्पीडने गाडी चालवली होती. त्यावेळी अनेक ठिकाणी सत्कारासाठी थांबे घेत, जेवणासाठी थांबूनही फडणवीस आणि शिंदे यांनी नागपूर ते शिर्डी हे अंतर पावणेपाच तासांमध्ये पार केले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास शिंदे-फडणवीस गाडीने नागपुरहून निघाले होते. संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास शिंदे-फडणवीसांचा ताफा शिर्डीत पोहोचला. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी किती वेगात गाडी चालवली असावी, याची कल्पना आपण करु शकतो.
समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची कशी समजूत काढली?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारकडून वातावरणनिर्मिती केली जात आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच प्रसारमाध्यमांना विशेष मुलाखती दिल्या. या मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा कसा साकार झाला, याविषयी खुलासा केला. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला होता. एमएसआरडीसी खाते माझ्याकडे असल्याने या विरोधाचे कारण जाणून घेण्यासाठी मी बुलढाण्याला गेलो होतो. त्यावेळी पूर्वी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याची माहिती समोर आली. तेव्हा मी शेतकऱ्यांची समजूत काढून त्यांना राजी केले आणि त्यांच्या खात्यात मोबदल्याच रक्कम अवघ्या चार तासांत जमा केली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.