कसबा पोटनिवडणुकीत प्रमुख पक्षांसह तब्बल २९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गेल्या ४० वर्षांपासून पक्षासाठी काम करत आहे आणि पक्षाने उमेदवारी देण्यासाठी पक्षाकडे दाभेकर यांनी आपली उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने दाभेकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला होता.
त्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून दाभेकर यांची मनधरणी सुरू होती.पण ते अपक्ष लढण्यावर ठाम होते आणि काल रात्री काँग्रसचे नेते राहुल गांधी यांचा फोन आल्याने दाभेकर यांनी आपल उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गेल्या ४० वर्षापासून पक्षासाठी काम करत आहे आणि जेव्हा आम्ही पोट निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती. तेव्हा मला उमेदवारी नाकारण्यात आली होती. मी पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळे बंड पुकारले होते. पण एका कार्यकर्त्याला जेव्हा राहुल गांधी यांचा फोन येतो, ही खूप गर्वाची बाब असून म्हणून मी माझं उमेदवारी अर्ज आज मागे घेतल्याचे दाभेकर म्हणाले. दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात मी सक्रिय असणार आहे. ही पोटनिवडणूक काँग्रेसला जिंकायचीच असल्याचे दाभेकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’शी बोलताना सांगितले आहे.
कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर यांच्यात मुख्य लढत
कसबा पोटनिवडणुकीत मुख्य लढत ही भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हिंदू महासभेचे आनंद दवे आणि अभिजित बिचुकले हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी नाकारल्याने कसब्यातील ब्राह्मण समाज नाराज झाल्याची चर्चा आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची समजूत काढल्याने भाजप पक्ष आता पूर्ण ताकदीने प्रचारात उतरला आहे. तर काँग्रेसलाही रमेश बागवे आणि बाळासाहेब दाभेकर यांची समजूत काढण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे आता कसबा पोटनिवडणुकीचा निकाल काय लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.