पुण्यात तीन दिवसांपूर्वी कदमवाक वस्ती परिसरात केवळ दोन तरुणांची नजरेला नजर भिडल्यानंतर वाद विकोपाला पोहोचला. या वादातून एका तरुणाने दुसऱ्यावर थेट धारदार सुऱ्याने वार करून त्याला जखमी केले.याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शिवम राखुंडे (वय २३) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी धीरज कांबळे (वय २३) व गणेश अनिल पांढरेकर (वय २१) यांना अटक केली आहे. तिघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत.कदमवाक वस्तीत हा प्रकार घडला आहे.
कदमवाक वस्तीतील एका प्रसिद्ध चहाच्या दुकानात ते एकत्र आले होते. त्यावेळी धीरज व शिवम यांची नजरेला नजर भिडली. त्यातून त्या दोघांत वाद झाले. त्यानंतर शिवमने धीरजला फोन करून तुझा काही तरी गैरसमज झाला आहे, असे म्हणत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पण, भाडणावेळी संतापलेल्या धीरजने त्याला भेटण्यासाठी म्हणून बोलावले. शिवम त्याच्या मित्रांसोबत तेथे गेल्यानंतर धीरज व गणेशने त्याला मारहाण करत सुऱ्याने वार केले. या हल्ल्यानंतर आरोपी फरार आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पुण्यात कोयता गँगची दहशत
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोयता गँगच्या दहशतीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. काही दिवसांपूर्वी सिंहगड लॉ कॉलेज परिसरात हातात कोयता नाचवत, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना कोयता दाखून, दुकानाच्या शटरवर कोयता मारून परिसरात दहशत माजवली होती. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने हालचाली करत एका आरोपीला तातडीने पकडले होते. तेव्हा पोलिसांनी कोयता नाचवणाऱ्या या आरोपीला सर्वांदेखत चोप दिला होता. तर दुसऱ्या आरोपीला बीडमधून अटक केली होती. या आरोपीची पोलिसांनी रस्त्यावर धिंड काढून त्याला सर्वांदेखत माफी मागायला लावली होती. यानिमित्ताने पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक बसवायचा प्रयत्न केला असला तरी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी घटना हा चर्चेचा विषय ठरत आहे.