यावेळी निलेश माझिरे यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली. वसंत मोरे यांचे वक्तव्यं माझ्या वाचण्यात आले. त्यांनी म्हटलं की, निलेश माझिरे पक्षात नाहीत तर आता त्यांचा आणि माझा संबंध नाही. मला त्यांना विचारायचं आह की, आपली मैत्री संपलेय का, पक्षात असो किंवा नसो, आपली मैत्री राहील, हा तुमचाच शब्द होता. त्यामुळे वसंत मोरे यांचे वक्तव्य ऐकून मला खूप वाईट वाटले. पण आता तुमच्याच वक्तव्याचा धागा पकडून सांगतो की, वसंत मोरे यांना माझी गरज नसेल तर मलाही त्यांची गरज नाही, असे निलेश माझिरे यांनी म्हटले.
मला एवढंच माहिती आहे की, ज्यावेळी तात्या अडचणीत होते तेव्हा मी त्यांच्यासोबत थांबलो होतो. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. मात्र, आता जेव्हा मी अडचणीत आहे, तेव्हा तात्यांनी असे बोलणे चुकीचे आहे. मला तात्यांनी फोन केला होता की, तुझा फोन बंद ठेव, महाराष्ट्र सैनिक बनून राहा. पण त्यासाठी मला काहीतरी कारण हवे होते. राज ठाकरे यांनी माझ्याकडून पद काढून घेतल्याचं मला वाईट वाटत नाही. कारण, महाराष्ट्र सैनिक माझ्या पाठिशी उभे आहेत. वसंत मोरे यांनी संबंध तोडायचे ठरवले असतील तर मी देखील का संबंध जपू, असे निलेश माझिरे यांनी म्हटले. राज साहेबांविषयी बोलायचे झाले तर ते माझे विठ्ठल आहेत. माझा वाद बडव्यांशी आहे. आता काहीजण विचारतात की, निलेश माझिरेसोबत पक्षातून बाहेर पडायला ४०० कार्यकर्ते कुठे आहेत? पण याच निलेश माझिरेने दोन महिन्यांपूर्वी २०० लोकांचा प्रवेश घडवून आणला होता. ती लोकं मी विकत आणली होती का? आतादेखील मला टायमिंग आणि वेळ सांगा, मी ४०० काय १००० कार्यकर्ते घेऊन कार्यालयात पोहोचेन, असे निलेश माझिरे यांनी ठणकावून सांगितले.
काही महिन्यांपूर्वीच निलेश माझिरे यांनी संघटनेतील अंतर्गत राजकारणाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळीच त्यांनी मनसे सोडण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र, राज ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर निलेश माझिरे यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हादेखील वसंत मोरे यांनीच निलेश माझिरे यांना शिवतीर्थवर नेले होते. तेव्हा राज ठाकरे यांनी माझिरे यांना माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्षपद दिले होते. मात्र, अवघ्या काही दिवसांतच राज ठाकरे यांनीच माझिरे यांना पदावरून दूर केले आहे.