गुणरत्न सदावर्ते यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उस्मानाबादमध्ये स्वतंत्र मराठवाडा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीही मराठा संघटनांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात आक्रमक निदर्शनं केली होती. तेव्हा पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेवेळी पोलिसांची सुरक्षा भेदून गुणरत्न सदावर्ते यांच्यावर काळी पावडर फेकली. या सगळ्यांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड केली. त्यांनी शरद पवारांचा उल्लेख वयोवृद्ध पुढारी आणि उद्धव ठाकरे यांचा उल्लेख बिळातील तत्कालीन मुख्यमंत्री असा केला. आज संविधान दिनी काही लोकांना आमच्या अंगावर सोडून आम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असलेल्या सेल्युलर जेलमध्ये उपवास करुन आलेली माणसं आहोत. आम्हाला या सगळ्या गोष्टी पानी कम चाय आहेत. मला शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरेंची कीव येते. त्यांनी संविधान दिनी माझ्यावर हल्ला केला, त्यांना लाज वाटली पाहिजे. माझ्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होती. तरीही माझ्या अंगावर काळी पावडर फेकण्यात आली. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवरही ती काळी शाई फेकली. या लोकांना आम्ही घाबरत नाही. आम्ही त्यांना उत्तर देऊ, असे गुणरत्न सदावर्ते यांनी ठणकावून सांगितले.
स्वत:ची बायको सोबत ठेवली की विनयभंगाचे आरोप होत नाहीत: सदावर्ते
गुणरत्न सदावर्ते यांनी शुक्रवारी उस्मानाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलतानाही राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते.ठाण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याने केला होता. मात्र, यामागे पूर्वनियोजित कट असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारविरोधात रान उठवले होते. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना फटकारले आहे. स्वत:ची बायको सोबत ठेवली की विनयभंगाच्या तक्रारी होत नाहीत, असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला. यावेळी सदावर्ते यांच्यासोबत त्यांच्या पत्नी जयश्री पाटील देखील होत्या. त्यांच्याकडे पाहत सदावर्ते यांनी म्हटले की, हे असं खरं प्रेम सोबत ठेवायचं असतं. म्हणजे कोणीही तुमच्यावर विनयभंगाचे आरोप करु शकत नाही, असे सदावर्ते यांनी सांगितले होते.