अजित पवार यांनी गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना दसरा मेळाव्यातील भाषणांविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात उपस्थित केलेले अनेक मुद्दे खोडून काढले. आता महाराष्ट्रातील मतदारांनी आणि शिवसैनिकांनी निर्णय घ्यायचा आहे. कोणाच्या पाठिशी उभं राहायचं? मूळ शिवसेना पक्ष कोणाचा आहे?, याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे. एकनाथ शिंदे हे आमच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा माझ्या उजव्या बाजूलाच बसायचे. पण तेव्हा झेंडा आमचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा ही भावना त्यांनी कधी बोलून दाखवली नाही. अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारने जे काही निर्णय घेतले ते सगळ्यांनी मिळून घेतले, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
तसेच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारकडून टक्केवारी मागण्यात आल्याचा आरोपही अजित पवार यांनी साफ फेटाळून लावला. आम्ही टक्केवारी मागितली असेल तर ते सिद्ध करुन दाखवा, असे प्रतिआव्हान अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले.
यावेळी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी येथील दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून जमवलेल्या गर्दीचाही उल्लेख केला. १० कोटी रुपये भरून दसरा मेळाव्यासाठी एसटी बसेस बुक करण्यात आल्या होत्या. राज्याच्या अनेक भागांतील एसटी बस दसरा मेळाव्यासाठी मुंबईत आल्याने सणाच्या दिवशी सर्वसामान्य प्रवाशांची अडचण झाली. गाव तिथे एसटी, असे सरकारचे धोरण आहे. पण काल सणाच्या दिवशी कामासाठी बाहेर पडलेल्या आणि नातेवाईकांना भेटायला निघालेल्या लोकांसाठी एसटी बसेस उपलब्ध नव्हत्या. अशा गोष्टी करणे योग्य नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.