सातारा जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे या दोघांनी जिल्ह्यात शिंदे गटाला ताकद देत गट वाढवण्यास मोठा हातभार लावला आहे. मात्र अलीकडच्या काही दिवसात दोन्ही नेत्यांमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू असल्याची चर्चा सध्या सातारा जिल्ह्यात आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. याबाबत आमदार महेश शिंदे यांना विचारले असता माझी शंभूराज देसाई यांच्यावर कोणतीही नाराजी नाही, असं सांगत अपेक्षा तर प्रत्येकालाच असते. ज्याचं नशीब असतं, त्यालाच मिळतं. मी माझं काम करत राहतोय, याचा रिझल्ट मला शंभर टक्के मिळणार, याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र महेश शिंदे यांनी दिलेल्या उत्तरातच अस्वस्थता जाणवत असल्याचं दिसून आलं.
महेश शिंदे यांना पालकमंत्री शंभुराज देसाई हवी तेवढी ताकद देत नसल्याच्या कारणावरुन आमदार महेश शिंदे नाराज असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहे. आमदार महेश शिंदे हे अॅग्रेसिव्ह नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र साताऱ्यात काम करत असताना पालकमंत्र्यांचा हवा तेवढा सपोर्ट मिळत नसल्याने महेश शिंदे नाराज असल्याच्या चर्चा शिंदे गटात दबक्या आवाजात सुरु आहे. जर ही नाराजी जास्त काळ टिकली तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या जिल्ह्यातच गट फुटण्याची चिन्हे निर्माण होतील, असंही पदाधिकारी खासगीत म्हणतायेत.