पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट या कालावधी होणार आहे. यापैकी तीन दिवस सुट्ट्यांमध्ये जाणार असल्याने अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज सहा दिवसांचेच असेल. त्यामुळे या सहा दिवसांमध्येच विरोधकांना शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरण्याची संधी आहे. शिवसेनेचे सभागृहातील घटलेले संख्याबळ लक्षात घेता त्यांच्याकडून प्रभावीपणे बाजू मांडली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. अशावेळी विरोधकांची सर्व मदार अजित पवार यांच्यासारख्या फर्ड्या वक्त्यावर होती. परंतु, आता मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळ्यात मोठी कारवाई होण्याचे संकेत देत एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव आणल्याचे म्हटले जाते. त्यामुळे हे दडपण झुगारून अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पावसाळी अधिवेशनात सरकारवर तुटून पडणार का, हे पाहावे लागेल.
मोहित कंबोज नेमकं काय म्हणाले?
मोहित कंबोज यांनी लवकरच पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा भांडाफोड करणार असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा तो नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला जाईल, असा इशारा कंबोज यांनी ट्विटमधून दिला. कंबोज यांनी एकूण तीन ट्विटस केली आहेत. यापैकी तिसऱ्या ट्विटमध्ये कंबोज यांनी २०१९ मध्ये परमबीर सिंग यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळा प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.